भारताच्या सीमेवर चीन जे करीत आहे, त्यामागे अनेक वर्षांचा विचार आणि पुढील अनेक दशकांचा वेध आहे. हा विचार केवळ भारतीय उपखंडाचा नाही, तर साऱ्या हिंद-प्रशांत क्षेत्राचा आहे. भारतालाही भविष्याचा वेध घेत पावले टाकायला हवीत...
भारतीय लष्कर आणि चीनची 'पीपल्स लिबरेशन आर्मी' यांच्यात अलीकडे प्रत्यक्ष ताबारेषेच्या चिनी बाजूकडील मोल्डो येथे कोअर कमांडर पातळीवर चर्चेची तेरावी फेरी पार पडली. पूर्व लडाखमधील हॉटस्प्रिंग्स येथील १५ क्रमांकाच्या गस्ती ठाण्यावरून दोन्ही बाजूंच्या फौजा मागे घेण्याचे उद्दिष्ट त्यात होते; परंतु या फेरीत कोंडी फुटली नाही. चीनच्या पश्चिम थिएटर कमांडच्या प्रवक्त्यांनी भारताकडून अवास्तव मागण्या होत असल्याचा आरोप केला. गेले १७ महिने दोन्ही लष्करे पूर्व लडाख सीमेवर अनेक ठिकाणी समोरासमोर उभी ठाकली आहेत. सप्टेंबर २०२०मध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ४५ वर्षांत प्रथमच गोळीबार झाला. पँगॉग सरोवराच्या दक्षिण तीराजवळ भारतीय लष्कराने भविष्यातील हालचालींचा वेध घेत काही मोहिमा केल्या. या पूर्वी अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला क्षेत्रात भारतीय गस्ती मोहिमेवर 'पीएलए'ने हल्ला चढविला; त्यावेळी भारत-चीन सीमेवरील गोळीबाराची घटना ऑक्टोबर १९७५मध्ये झाली होती. गेले १७ महिने चीन ज्या प्रकारे ठाण मांडून बसला आहे, त्याची व्याप्ती पाहिल्यास 'पीएलए'ने अशा झुंजीसाठी बरीच आधी तयारी केली असावी. सन २०२०च्या प्रारंभी तिबेटमध्ये सुरू झालेल्या मोठ्या लष्करी युद्धसरावातील सैनिक व प्रशिक्षणार्थी (कॉनस्क्रिप्ट्स-सैन्यातील अनिवार्य सेवेचे तरुण) यांच्या फौजा पूर्व लडाख सीमेकडे वळवण्यात आल्या. त्यातून हा झुंजीचा प्रसंग उभा राहिला. सीमेवर चीनने ज्या कारवाया सुरू केल्या, त्यांचा आवाका बघता भारतीय मुलकी व लष्करी गुप्तवार्ता यंत्रणांना धक्का बसला. या पूर्वी गेल्या दीड दशकात किमान तीन वेळा चीनने सीमा तंट्यावरून काही प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. या घटना पुढील पेचप्रसंगाच्या निदर्शक होत्या. त्यातून भारतीय संरक्षण दले आणि सामरिक समुदायाला चीनचा पवित्रा बदलत असल्याची चाहूल लागायला हवी होती.
Comments